मुंबई : मुंबईमध्ये घराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. प्रत्येकाचे मुंबईमध्ये स्वत: च्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र, सध्याच्या किंमती बघता सर्वसामान्यांना घर घेणे कठीण होऊन बसले आहे. म्हाडाकडून लोकांना स्वस्त दरात घर उपलब्ध करून दिली जातात.
आता नुकताच म्हाडाकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. तुमचे देखील मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न आता पुर्ण होऊ शकते. मुंबईत ५००० घरांची लॉटरी दिवाळीच्या अगोदर लागणार आहे. नुकताच म्हाडाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी ही घोषणा करण्यात आली आहे.
सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत म्हाडाच्या लॉटरीबद्दल घोषणा केली. यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने पुढील वर्षभरात मुंबईसह राज्यात १९,४९७ घरं बांधणीचं उद्दिष्ट ठेवलं असून मुंबईत ५१९९ घरं बांधली जाणार आहेत. दिवाळीच्या अगोदरच ही लॉटरी निघेल असे संजीव जयस्वाल यांनी सांगितले आहे. यासोबतच रिक्त घरांबद्दलही संजीव जयस्वाल यांनी माहिती दिली. अनेकांना आता मुंबईत त्यांच्या स्वप्नातील स्वत:चे घर मिळणार आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या म्हाडाने २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात म्हाडाने मुंबईसह पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि कोकणात १९ हजार ४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासातील काही घरांच्या चावीचे देखील वाटप केले जाणार आहे.
साधारण मे महिन्यात याबाबातची घोषणा म्हाडाकडून केली जाणार असल्याचे संजीव जयस्वाल यांनी म्हटले आहे. म्हाडाकडून ही ५००० घरांची लॉटरी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात काढली जाणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर लवकरच सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. समिती पुढील महिन्यात हा अहवाल उपाध्यक्षकांकडे पाठवेल आणि त्यानंतर शासनाकडे शासनाकडे मंजुरीकडे पाठवण्यात येईल.
