मुंबई : म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी अर्ज करताना अर्जदाराला 1 जानेवारी 2018 नंतर जारी केलेले महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकिट) अपलोड करावे लागेल, असे म्हाडाच्या मुख्य माहिती व संपर्क तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांनी सांगितले.
अर्जाची नोंदणी करताना इच्छुक अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असावा. नोंदणीच्या वेळी अर्जदाराने डीजी लॉकरमध्ये स्वतःचे तसेच त्याच्या जोडीदाराचे आधार आणि पॅन कार्ड अपलोड करावे लागेल आणि ते लिंक करावे लागेल. यामुळे पडताळणीदरम्यान ही कागदपत्रे म्हाडाकडे उपलब्ध होतील, असे बोडके यांनी सांगितले.
मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड म्हणाले, अर्ज भरताना विवाहित अर्जदारांनी विहित ठिकाणी विवाहित म्हणूनच नमूद करणे आवश्यक आहे. असे न केल्यास विजेत्यास फ्लॅट नाकारला जाऊ शकतो. घटस्फोटित अर्जदारांना फ्लॅटचा ताबा देताना डिक्री सादर करावी लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीतील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
वाचा : मुंबईत 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार; म्हाडा योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या
पासवर्ड द्यावा लागणार
अर्जाच्या वेळी उत्पन्नाचा पुरावा म्हणून आर्थिक वर्ष 2023-24 चे आयकर विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे आणि या वर्षी लॉटरी प्रणालीमध्ये अर्जदाराला त्याच्या आयकर खात्याचा पासवर्ड द्यावा लागेल आणि तसेच आयकर खात्याला टू स्टेप व्हेरिफिकेशन लावलेले असेल तर ते अर्ज प्रक्रिया होईपर्यंत काढून टाकावे. एकूण उत्पन्नाचा उल्लेख करताना अर्जदाराने आयकर विवरणपत्रात एकूण उत्पन्नाची रक्कम नमूद करावी लागणार आहे.
वाचा : मुंबईत म्हाडा लॉटरीत सर्वात स्वस्त व सुंदर घर; पाहा कुठे अन् किंमत किती
कुठेही पक्के घर नसावे
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उपलब्ध घरांसाठी अर्ज करण्यासाठी, योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी नसल्यास, विजेत्याला सोडत पश्चात नोंदणी म्हाडा करून देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि पती-पत्नीकडे देशात कुठेही पक्के घर नसावे.
वाचा : म्हाडा मुंबई अल्प व अत्यल्प गट संपूर्ण माहिती । Mhada Mumbai Lottery EWS group details