लॉटरीच लागली! मुंबईतील या मोक्याच्या ठिकाणी मिळणार 800 ते 2500 चौरस फुटांची घरं

Mumbai : मुंबई शहरात घर खरेदीचा विषय काढला तरीही अनेकांनाच घाम फुटतो आणि यामागचं कारण म्हणजे शहरात गगनाला भिडणाऱ्या घरांच्या किमती. नव्यान घर खरेदी करायचं झाल्यास शहरात साध्या 1RK घरासाठीसुद्धा 70 लाख रुपये मेजावे लागत आहेत. सामान्यांच्या आवाक्याबाहेर असणारी हीच रक्कम पाहून अनेक मुंबईकरांनी उपनगरांना प्राधान्य दिलं आहे. याचदरम्यान शहरातील काही नागरिकांना मात्र नव्या घराची लॉटरीच लागणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन आणि मुंबईचं हृदय अशी ओळख असणाऱ्या वरळीतील आदर्शनगर या म्हाडाअंतर्गत असणाऱ्या इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. जवळपास मागील दोन वर्षांपासून या दोन्ही महत्त्वाच्या भागांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव प्रलंबित होता, आता मात्र त्यास मान्यता मिळाल्यामुळं पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, त्याअंतर्गत नागरिकांना तुलनेनं अधिक क्षेत्रफळाचं अर्थात मोठं घर मिळणार आहे.

पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीच्या आदर्श नगर येथील रहिवाशांना 800 ते 2500 चौरस फुटांची घरं मिळतील. तर, वांद्रे रिक्लेमेशन येधील रहिवाशांसाठी ही मर्यादा 1000 के 1200 चौरस फूट इतकी असेल अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर वसाहतींच्या पुनर्विकास प्रक्रियेतून म्हाडाला एकसरशी 1 लाख 14 हजार 822 चौरस मीटर इतका विस्तीर्ण भूखंड उपल्बध होणार असून, तिथं हजारो घरांची उभारणी करण्यात येईल. इथं तयार केली जाणारी घरं म्हाडा सोडतीच्या माध्यमातून इच्छुकांसाठी उपलब्ध करून देईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं एकिकडे स्थानिकांना पुनर्विकासानं दिलासा मिळतानाच शहरातील या मोक्याच्या ठिकाणी घर घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीसुद्धा एक मोठी संधी उपलब्ध होणार हे नाकारता येत नाही.

वांद्रे रिक्लेमेशन इथं 197466 चौरस मीटर, तर वरळी आदर्श नगर 68034 चौरस मीटर इतकी जागा उपलब्ध आहे. तेव्हा आता या प्रक्रियेतून उभारल्या जाणाऱ्या नव्या घरांमुळं स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे हेच इथं स्पष्ट होत आहे. यापूर्वी वांद्रे, वरळी आणि काळाचौकी येथील अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला होता. जिथं फक्त अभ्युदय नगरच्याच प्रस्तावाला राज्य शासनानं मान्यता दिली होती. आता मात्र या दोन वसाहतींच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाल्यानं शहरातील अतीव महत्त्वाच्या भागाचाही कायापालट होणार हे नक्की.
वाचा : मुंबईत फक्त १२ लाखांत घर; ४,७०० घरांसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार

Leave a Comment