मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना ITR पासवर्ड टाकावा लागणार

मुंबई : म्हाडा गृहनिर्माणासाठी अर्ज भरताना अर्जदारांना आता आयटीआर पासवर्ड टाकावा लागेल. तसेच आयकर खात्याला टू स्टेप व्हेरिफिकेशन लावलेले असेल तर ते अर्ज प्रक्रिया होईपर्यंत काढून टाकावे, असे आवाहनदेखील म्हाडाने केले आहे. गेल्या वर्षी काढलेल्या सोडतीमध्ये काही अर्जदारांच्या आयटीआरमध्ये तफावत आढळल्याने म्हाडाला अशा अर्जदारांचे वास्तविक उत्पन्न तपासण्यात अनेक अडचणी आल्या, तर काही अर्जदारांनी आयटीआरचे अस्पष्ट चित्र अपलोड केल्याने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा म्हणून आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयटीआर सादर करणे आवश्यक आहे, असे मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (विपणन) राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. म्हाडाने आयकर विभागाकडून एपीआय घेतले आहे. अर्जदाराने आयकर विभागाकडे अपलोड केलेले आयटीआर रिटर्न संबंधित अर्जदाराने परवानगी दिल्यासच म्हाडाला उपलब्ध होईल. परवानगी देणे म्हणजे अर्ज भरताना संबंधित लॉगिनमध्ये पासवर्ड टाकणे. हा पासवर्ड म्हाडाला डिस्कोज होत नाही. त्यामुळे अर्जदारांनी काळजी करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या ऑनलाइन संगणकीकृत सोडतीबाबत अर्जदारांच्या शंका दूर करण्यासाठी सोमवारी म्हाडाकडून ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 4500 अर्जदारांनी ऑनलाइन सहभाग घेतला. संगणकीकृत लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in आणि ॲप MHADA हाउसिंग लॉटरी सिस्टम वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

लग्नाबाबत खोटी माहिती दिल्यास घर मिळणार नाही

अर्ज भरताना विवाहित अर्जदारांनी विवाहित असल्याचे नमूद करावे लागेल, अन्यथा चुकीची माहिती दिल्यास सोडतीत विजेते ठरलेल्या संबंधित अर्जदाराला घरापासून वंचित राहावे लागेल, असे स्पष्टीकरण म्हाडाने दिले आहे. घटस्फोटित अर्जदारांना घराचा ताबा देताना डिक्री सादर करावी लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या अर्जदारांनी घराचा ताबा घेण्यापूर्वी जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही म्हाडाने म्हटले आहे.

वाचा : मुंबईत म्हाडा लॉटरीत सर्वात स्वस्त व सुंदर घर; पाहा कुठे अन् किंमत किती

Leave a Comment