Maharashtra Weather News : यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात पावसाने झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शुक्रवारपासून मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत सुरू झालेल्या पावसाने कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रालाही झोडपून काढले आहे. येत्या 24 तासांत राज्यातील विदर्भ पट्ट्यात पावसाची तीव्रता वाढणार असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे सध्या ही प्रणाली तयार होत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदियासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा स्थितीत कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, कोकणात गौराईचं आगमन पावसासोबतच होणार यात शंका नाही. त्याचवेळी मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील घाट परिसरात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत विदर्भात पावसासोबत वादळी वारे वाहत आहेत, त्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वाचा : मुंबईत अर्ध्या किंमतीत म्हाडाचे 2BHK घर, पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती