मुंबई : म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करत गृहनिर्माण योजनेतील घरांच्या नावे सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडा प्राधिकरणाने अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर विभागात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, तसेच अनामत रक्कम अदा करावी असे आवाहन म्हाडा प्राधिकरणाने केले आहे.
मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी अर्ज भरण्याची तसेच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ९ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अर्ज करताना म्हाडाच्या अॅपमध्ये काही तांत्रिक अडथळे निर्माण होत असल्याने इच्छुकांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यामध्ये अर्ज भरण्यास अनेकांना बराच अवधी लागत आहे. परंतु काही अज्ञात व्यक्तींनी तांत्रिक अडथळ्यांचा फायदा घेत चक्क म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करून नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केल्याची बाब उघड झाली आहे.
https:// mhada. gov. in हे म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळासारखे भासणारे https:// mhada. org हे बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. बनावट संकेतस्थळावरील तपशील म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच आहे. या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबवता पैसे भरण्याचा पर्याय देत नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. याद्वारे फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने म्हाडाशी संपर्क साधल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.
फसवणूक झालेल्या व्यक्तीने बनावट संकेतस्थळावरून घराच्या विक्री किमतीपैकी ५० हजार रुपये रक्कम भरली. ही रक्कम भरल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक बनावट पावतीही देण्यात आली. मात्र त्यात काहीतरी चुकीचे आढळल्याने त्या व्यक्तीने म्हाडाकडे धाव घेत सदर प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला. म्हाडाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार सायबर गुन्हे विभागाकडे अज्ञात व्यक्तीविरोधात मंगळवारी तक्रार दाखल केली आहे.
‘अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करा’
बनावट संकेतस्थळाच्या आधारे अर्जदारांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच घरासाठी नोंदणी, अर्ज करावा आणि अनामत रक्कम भरावी, असे आवाहन म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
वाचा : मुंबईत म्हाडा लॉटरीत सर्वात स्वस्त व सुंदर घर; पाहा कुठे अन् किंमत किती