दोन दिवसातच म्हाडाचे सोडतीचे अ‍ॅप संथ, येताय ‘हे’ अडथळे

मुंबई : मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी म्हाडाने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतर दोन दिवस होत नाही तोच म्हाडा लॉटरी ॲपची गती मंदावली आहे. नोंदणी, ऑनलाइन दस्तऐवज सादर करणे आणि कागदपत्रांची पडताळणी करताना अडथळे येत आहे आणि त्यासाठी बराच वेळ जात आहे. अशा स्थितीत अर्जदार संतप्त झाले आहेत. मुळात यंदा अर्ज भरण्यासाठी अवघे 26 दिवस उरले असून ॲपबाबत अनेक तक्रारी म्हाडा प्राधिकरण आणि मुंबई मंडळाकडे येत आहेत.

तारदेव, वरळी, वडाळा, दादर, पवई, विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली आदी भागातील 2030 घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली असून तीन दिवसांत जमा रकमेसह 1000 अर्ज जमा झाले आहेत. ही संख्या कमी मानली जात आहे. मुळात अत्यल्प आणि अल्प गटातील घरे यंदा बरीच महाग असल्याने इच्छुक सोडतीकडे पाठ फिरवतील, अशी भीती व्यक्त होत आहे. यामध्ये अर्ज भरण्यासाठी पुढे येणाऱ्या उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत आहेत. लॉटरी ॲप अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची प्रक्रिया संथ आहे.

प्रत्येक मंडळाने अर्ज स्वीकारण्यासाठी किमान 45 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्याचबरोबर मुंबई मंडळाने यावेळी केवळ 26 दिवसांची मुदत दिली आहे. एवढ्या कमी वेळेत कागदपत्रे कशी जमा करायची, जमा झालेल्या रकमेचा ताळमेळ कसा बसवायचा, असा प्रश्न अनेकांना भेडसावत असतानाच आता इच्छुकांना ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. या अडचणी कायम राहिल्यास 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरायचे कसे, असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत. त्यामुळे ॲपमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात किंवा अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवावी, अशीही मागणी उमेदवारांकडून होत आहे.

उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्डची पडताळणी करण्यास विलंब झाल्यामुळे नोंदणी आणि अर्ज भरण्यास वेळ लागतो. याबाबत मुंबई मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे मान्य केले आहे. परंतु कागदपत्रांची काटेकोर पडताळणी सुनिश्चित करण्यासाठी ॲपमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी उत्पन्नाच्या माहितीसह चुकीची माहिती देऊन म्हाडाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे. यासाठी आम्ही काही बदल केले असून या बदलानुसार कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. अशा स्थितीत नावात किंवा अन्य माहितीत तफावत आढळल्यास पडताळणीला विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कागदपत्रांच्या पडताळणीला गती देण्यासाठी ॲपमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढविण्याच्या निर्णयाची जबाबदारी म्हाडाच्या उपाध्यक्षांची असेल, असे ते म्हणाले.

वाचा : निम्म्याहून अधिक घरांचा ताबा नववर्षात? म्हाडा लॉटरीबद्दल महत्वाची माहिती 

1 thought on “दोन दिवसातच म्हाडाचे सोडतीचे अ‍ॅप संथ, येताय ‘हे’ अडथळे”

Leave a Comment