म्हाडाचे 24 लाखांचे घर थेट 50 लाखांवर

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक गृहप्रकल्प योजनेतील घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्याचे प्रकार विकासकांकडून सुरूच आहेत. फेब्रुवारी २०२४ मधील सोडतीत ठाण्यातील कावेसर येथील संकेत क्रमांक ३६५ मधील घरांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. घराची २४ लाख २४ हजार ८०० रुपये किंमत थेट ५० लाख १३ हजार ८९२ रुपये करण्यात आली आहे. ही किंमत ऐकूनच या योजनेतील विजेत्यांना भोवळ आली आहे. वाहनतळ, क्लब हाऊस, देखभाल शुल्क आणि इतर शुल्काच्या नावाखाली विजेत्यांची लुट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोकण मंडळाने सप्टेंबर २०२३ मध्ये ५,३११ घरांसाठी सोडत जाहीर करून अर्ज विक्री – स्वीकृती सुरू केली. मात्र काही कारणाने ही सोडत लांबणीवर पडली आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये सोडतीचा निकाल जाहीर झाला. या सोडतीत २० टक्के योजनेतील घरे मोठ्या संख्येने समाविष्ट होती. या घरांना चांगला प्रतिसादही मिळाला. खासगी विकासकांच्या प्रकल्पात परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होत असल्याने २० टक्के योजनेतील घरांना चांगली मागणी होती. पण आता मात्र २० टक्के योजना वादात अडकण्याची शक्यता आहे.

वाचा : मुंबईत म्हाडा लॉटरीत सर्वात स्वस्त व सुंदर घर; पाहा कुठे अन् किंमत किती

याआधीच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील २० टक्के योजनेतील घरांच्या किंमतीत विकासकांनी मनमानीपणे भरमसाठ वाढ केली आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी मंडळाकडे आल्या आहेत. मुळात नियमानुसार सोडतीतील किंमतीवर विकसकाला सोयी-सुविधांसाठीचे शुल्क वसूल करण्याचे अधिकार आहेत. मात्र या सोय-सुविधांच्या नावाखाली विकासक मनमानीपणे किंमतीत वाढ करीत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यात अद्याप म्हाडाला यश आलेले नाही. २०२४ मधील सोडतीत २० टक्के योजनेतील घरांच्या किंमतीतील वाढ भोवळ आणणारी आहे.

वाचा : म्हाडाची पुन्हा दुसरी सोडत? हिरानंदानी प्रकल्पातील 1,220 घरांचा समावेश

कोकण मंडळाच्या २०२४ च्या सोडतीतील कावेसर येथील संकेत क्रमांक ३६५ मधील ४३.०२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घरांसाठी मंडळाने २४ लाख २४ हजार ८०० रुपये अशी किंमत निश्चित केली आहे. गोदरेज समुहाच्या प्रकल्पातील हे घर आहे. नियमानुसार वाहनतळ आणि इतर शुल्क, मुद्रांक शुल्क मिळून या घरांच्या किंमतीत जास्तीत जास्त १० लाखांची वाढ विजेत्यांना अपेक्षित होती. त्यानुसार विजेत्यांनी मानसिक तयारीही केली होती. मात्र नुकतेच विजेत्यांच्या हाती घरांच्या एकूण किंमतीचे विवरण हाती पडले असून घराची किंमत पाहून विजेते चक्रावल्याची माहिती एका विजेत्याने ‘लोकसत्ता’ला दिली. २४ लाखांवरून ३४-३५ लाख रुपये अशी किंमत आकारली जाईल असे वाटत होते. पण विकासकाने घराच्या किंमतीपोटी थेट ५० लाख १३ हजार ८९२ रुपये भरावे लागतील असे विजेत्यांना कळविले आहे.

वाचा : मुंबईतील म्हाडाच्या या 550 घरांचा ताबा मार्च 2025 मध्ये । mumbai home

‘मुजोरी मोडून काढा’

क्लब हाऊससाठी आठ लाख, वाहनतळासाठी सात लाख वसूल करण्याचे निश्चित केले आहे. तर १२ महिन्यांचे देखभाल शुल्क थेट ५१ हजार १०८ रुपये आकारण्यात आले आहे. एकूणच सदनिकेची किंमत ४० लाखांच्या वर गेल्याने मुद्रांक शुल्क चार लाख, तर वस्तू आणि सेवा शुल्क चार लाखांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे या घरासाठीच्या विजेत्यांना घरासाठी ५० लाख १३ हजार ८९२ रुपये मोजावे लागणार आहेत. आर्थिक दुर्बलांना खासगी विकासकांच्या प्रकल्पातील चांगली घरे परवडणाऱ्या दरात मिळावी आणि त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी २० टक्के योजना आणण्यात आली आहे. असे असताना सोडतीतील २० टक्के योजनेतील घरांच्या किमतीत मनमानी वाढ करून विजेत्यांची लूट केली जात आहे. यावर म्हाडा आणि सरकारने नियंत्रण आणावे, विकासकांची मुजोरी मोडून काढावी, अशी मागणी विजेत्यांकडून होत आहे. दरम्यान, याविषयी गोदरेजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. म्हाडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

वाचा : मुंबई म्हाडा लॉटरीला अल्प प्रतिसाद, 50 हजारांचा पल्ला गाठणार नाही?

Leave a Comment